सहा रहस्य जी तुम्हाला आत्मनिर्भर बनवतील!

 


 सहा रहस्य जी तुम्हाला आत्मनिर्भर बनवतील! 


^ काहीतरी करून दाखवायचे आहे पण काय ते कळत नाही का ? 

^ लॉकडाऊनमुळे घरात बसून मन आणि बुद्धीला गंज  चढला असे वाटते का?

^ प्रचंड माहिती उपलब्ध असताना मार्ग सापडत नाहीये का ?

जर या सगळ्या प्रश्नांची उत्तर होय असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. हा ब्लॉग संपूर्ण वाचा, तुम्हांला याची उत्तरे निश्चितपणे मिळतील.

मला काहीतरी करून दाखवायचं, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं, माझी स्वतःची ओळख असावी, असे विचार बऱ्याच जणींची असतात.ते पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. परंतु विचारांना योग्य दिशा न मिळाल्याने किंवा आपण नेमके कुठे कमी पडतो हे न समजल्यामुळे काहीजण या सगळ्या गोष्टींपासून दूर राहतात आणि मग स्वतःची ओळख निर्माण होता होता हे विचार तसेच सुप्तावस्थेमध्ये आपल्या मनात राहून जातात.  परंतु जर का तुम्ही ही सहा रहस्य आपल्या रोजच्या जीवनात वापरू लागलात तर तुमच्या सुप्तावस्थेत घडलेल्या या विचारांना पूर्ण करण्यास मदत होईलच आणि स्वतःची ओळख नक्कीच निर्माण करू शकाल.

चला तर मग बघुया आपल्याकडे अशा कोणत्या सहा गोष्टी हव्यात, ज्या आपल्याला आत्मनिर्भर बनवतील.

1. स्व-शोध :

हल्लीच्या या धकाधकीच्या जीवनात आपण कुठेतरी हरवून गेलोय असं मला वाटतं. आपल्याला काय करायचं आहे किंवा आपल्याला काय आवडतं हेच आपण विसरून जातो. घड्याळाच्या काट्यावरती चालताना आपल्यासाठी काय महत्त्वाचे आहे किंवा कोणत्या गोष्टीतून आपण आनंद आणि पैसा दोन्ही  मिळवू शकतो याचा मेळ घालू शकत नाही आणि म्हणूनच स्व-शोध. स्वतःला शोधणे ही आत्मनिर्भर होण्याची पहिली पायरी आहे,असं मला वाटतं. ज्यावेळी आपल्याला समजेल की, अशी कोणती गोष्ट आहे जी केल्याने मला नेहमी उत्साही वाटते, ऊर्जा मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं समाधान मिळते ती जर आपल्याला समजली तर आपल्याला आत्मनिर्भर होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.


2. स्पष्टता :

स्वतःचा शोध घेतल्यानंतर बरेचदा असं लक्षात येतं की, एकाच वेळेला बऱ्याच गोष्टी आवडत असतात.  मात्र त्यातही अशी कोणती गोष्ट आहे जिला आपण आपली अद्वितीय गुणवत्ता किंवा इकेगाई म्हणू शकतो? हे ठरवावे लागेल.  त्याचबरोबर त्या मार्गावर चालण्यासाठी कोण-कोणत्या कौशल्यांची आवश्यकता आहे? त्यापैकी कोणत्या आपल्याला येतात? कोणत्या शिकाव्या लागतील आणि आत्मसात करून त्याची अंमलबजावणी करावी लागेल,  हे जर आपल्याला कळले तर आपल्याला आयुष्याच्या मार्गावर चालताना येणाऱ्या अडचणी सहज टाळता येतील.

3. नियोजन: 

मला वाटतं आत्मनिर्भरतेच्या प्रवासामध्ये नियोजनाची स्वतःची एक महत्त्वाची भूमिका आहे. ज्याद्वारे आपण आपले कोणते काम कोणत्या पद्धतीने आणि किती वेळात पूर्ण करू शकतो, याचा अंदाज घेऊन व्यवस्थितरित्या नियोजन करणे, हे महत्त्वाचे आहे. बरेचदा छोटी-छोटी कामे करायच्या नादात मोठे आणि महत्त्वाचं काम विसरले जाण्याची शक्यता असते, अशा वेळेला नियोजन उपयोगी पडते.


4. आत्मविश्वास :

आत्मनिर्भरतेच्या मार्गावरचा सगळ्यात महत्त्वाचा आणि परिणामकारक वळण म्हणजे ‘आत्मविश्वास’. ज्या वेळेला आपल्याकडे विचारांची स्पष्टता असते, कृतींचे नियोजन असतं आणि त्यासाठी आवश्यक कौशल्य असतात त्यावेळी आपोआपच आपला आत्मविश्वास वाढतो आणि ठरवलेलं कार्य किंवा कृती आपण तिशय परिणामकारकरित्या पार पडतो.

5. कृती: 

“खयाली पुलाव” ऐकून सगळ्यांना माहितीच असेल.योग्य विचारांना जर कृतीची जोड मिळाली तर निश्चितच ठरवलेलं काम किंवा ध्येय आपण यशामध्ये परावर्तित करू शकतो. तसे तर प्रत्येक जण प्रचंड विचार करतो, मात्र त्यातल्या काहीच गोष्टींवर ती कृती केली जाते. बऱ्याच चांगल्या गोष्टी ह्या केवळ विचारात असल्यामुळे अपूर्ण राहतात आणि म्हणूनच अपूर्ण राहणाऱ्या चांगल्या गोष्टींना जर वास्तवामध्ये आणायचे असेल तर त्याला कृतीची जोड द्यायलाच हवी.

6. चुकांकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन:

हे सगळ्यात महत्त्वाचं रहस्य आहे जे आपल्याला चुकांमधून शिकायला लागते. संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे “निंदकाचे घर असावे शेजारी” म्हणजेच आपल्या वैयक्तिक प्रगतीसाठी आणि सुधारणेसाठी सांगितल्या जाणाऱ्या चुका व टिका जर आपण सकारात्मकरित्या स्विकारल्या तर आपल्या वैयक्तिक प्रगतीला केवळ आकाश ठेंगणे होईल.


तर ही होती आत्मनिर्भरतेच्या मार्गावरची सहा रहस्य तुम्हाला कशी वाटली? मला नक्कीच कमेंट करून कळवा.

मी सौ. प्रणोती यशवंत शितोळे ‘महिला आत्मनिर्भरता मार्गदर्शक’, ‘मी आत्मनिर्भर’ या फेसबुक ग्रुपची संस्थापिका.  सोबत “मी आत्मनिर्भर” या फेसबुक ग्रुपची लिंक देत आहे. जर तुमच्या आत्मनिर्भर बनण्याच्या प्रवासात मला सामील करून घेऊ इच्छित असाल तर नक्की जॉईन व्हा “मी आत्मनिर्भर” या फेसबूक ग्रुपमध्ये😊

धन्यवाद!

https://www.facebook.com/groups/1520377475017359/?ref=share

Comments

  1. खुपच सुदंर ...खरच आत्म निर्भर होन्यासाठी आवश्यक सर्व ...मुद्दे

    ReplyDelete

Post a Comment